विजयादशमी 2021 (दसरा) – नवरात्र संपले की दहाव्या दिवशी दसरा उजाडतो. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे आपण या सणाबाबत म्हणतो. दसरा म्हणजे विजयादशमी. विजयादशमी हा साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त. हा सण आश्विन शुद्ध १० या महिन्यात येतो. या दिवशी नवे व शुभकार्य करण्यास आरंभ करतात. शाळेतील मुले सरस्वतीची म्हणजे विद्येच्या देवतेची पूजा करतात.
पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटाच्या घरी गेले त्या वेळी त्यांनी आपली आयुधे अरण्यात शमीच्या झाडावर ठेवली.अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व शमीच्या झाडाची पूजा केली. तो दिवस अश्विन शुद्ध १० होता.
या दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा प्रचलित आहेत.
पैठण शहरात देवदत्त नावाच्या ब्राह्मणास कौत्स नावाचा एक पुत्र होता. तो वरतंतू ऋषीकडे विद्याभ्यास करण्यासाठी गेला. थोड्याच वर्षांत कौत्स सर्व म्हणजे चौदा विद्यांत पारंगत झाला. तेव्हा घरी परत येतेवेळी गुरुदक्षिणा काय द्यावी हे कौत्साने गुरूंना विचारले. पण त्यांनी गुरुदक्षिणा घ्यावयास नकार दिला. परंतु कौत्साने फारच आग्रह केल्यामुळे त्यांनी प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितले. त्यानुसार कौत्स रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विजित यज्ञ केल्यामुळे त्याचा खजिना रिकामा झाला होता. तरीपण राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे ठरविले.

इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. तेव्हा इंद्राने कुबेराला शहराबाहेर असलेल्या शमीच्या व आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करावयास सांगितले. नंतर रघुराजाने त्या सुवर्णमुद्रा कौत्साला घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्व मुद्रा घेऊन कौत्स वरतंतू ऋषीकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्याची विनंती केली. परंतु ऋषींनी त्यांपैकी फक्त चौदा कोटी मुद्रा घेऊन बाकीच्या परत केल्या. त्या राहिलेल्या मुद्रा कौत्स रघुराजाकडे परत घेऊन गेला. परंतु राजाने त्या परत घेण्यास नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा शमीच्या व आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या. लोकांनी त्या वृक्षाची पूजा करून हव्या तशा त्या मुद्रा लुटल्या. तो दिवस आश्विन शुद्ध १० होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा आहे.
विजयादशमी 2021 (दसरा)
महिषासुर राक्षस पृथ्वीवरील सर्व लोकांचा अमानुषपणे छळ करीत असे. तेव्हा परमेश्वराने अष्टभुजा देवीचे रूप धारण करून त्याच्याशी दहा दिवस युद्ध करून त्याला ठार केले व विजय प्राप्त केला. म्हणून या दिवसाला विजयादशमी हे नाव पडले.
विजयादशमीच्या दिवशी ग्रंथ, पोथ्या, शस्त्रे, हत्यारे, वाद्ये यांची पूजा करावी. तसेच ईशान्य दिशेला जाऊन शमीची अथवा आपट्याच्या वृक्षाची पूजा करावी. नंतर त्यांची पाने तोडून आई, वडील, गुरुजन, इष्टमित्र, नातेवाईक यांना सोने म्हणून वाटावे. शेजारीपाजारी अथवा इतरांशी आपले वैर, भांडण असेल तर ह्या पवित्र दिवशी झाले गेले गंगेला अर्पण’ असे मानून चांगल्या विचारांची, सद्भावनेची देवाणघेवाण करावी. फार पूर्वी क्षत्रिय राजे आणि मराठेशाहीच्या काळात मराठे विजयादशमीच्या मुहूर्तावर स्वारी करण्यास निघत असत. तसेच पेशव्यांच्या कारकीर्दीत या सणाचे फार महत्त्व होते. सीमोल्लंघन – स्वारी या नावाने हा दिवस मोठमोठ्या मिरवणुका काढून साजरा करीत.
दसरा म्हणजे विद्या, शौर्य, धन संपादन करण्यास विजय मिळवून देणारा दिवस. दसरा म्हणजे वीरतेचे वैभव, शौर्याचा शृंगार व पराक्रमाची पूजा यांचे प्रतीक आहे. दसरा म्हणजे भक्ती आणि शक्ती यांचे पवित्र मीलन होय. सांप्रतच्या काळात या सणाचे महत्त्व व उद्देश लक्षात घेऊन सर्वांनी कठोर परिश्रम करून देशाचे दारिद्रय दूर करण्यास साहाय्य करावयास पाहिजे. समाजातील अज्ञान व अंधश्रद्धा यांचे सीमोल्लंघन करण्यास कटिबद्ध राहिले पाहिजे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून मानवी जीवन सुधारावयास हवे.
अजून वाचा – Aarti Sangrah in Marathi | आरती संग्रह (संपूर्ण)
Leave a Reply