Kojagiri Purnima – Sharad Purnima कोजागिरी पौर्णिमा 2021 – “कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच ‘धवलरंगी’ उत्सव”
आश्विनी पौर्णिमेला हे नाव आहे. लक्ष्मी म्हणजे भाग्यदेवता मध्यरात्री ‘कोजागर्ति?’ असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते.
उपवास, पूजन व जागरण या तिन्ही गोष्टींना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. कोजागिरीच्या रात्री मंदिरे, घरे, रस्ते, उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात. या रात्री जितके दिवे लावावे, तितके कल्प मानवाला सूर्यलोकात प्रतिष्ठा मिळते, असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र यांच्या प्रतिमांची पूजा करून पुढील मंत्रांनी त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात.
नमस्ते सर्व देवानां वरदाऽसि हरिप्रिये ।
या गतिस्तवत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ॥
त्याचा भावार्थ असा की, ‘हे हरिप्रिये लक्ष्मी, तू सर्व देवदेवतांना वर देणारी आहेस. तुला प्रणाम असो. तुला नतमस्तक होणाऱ्यांना जी गती लाभते ती तुझ्या आराधनेने, पूजेने मला प्राप्त होवो.’
कोजागरी पौर्णिमा…
आश्विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात, या दिवशी रात्री इंद्राची पूजा करतात. पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वी वर उतरते व को जागर्ति? कोण जाग आहे? असा प्रश्न विचारते, जो जागा असेल त्याला ती धनधान्य देते. यावरून कोजागरी पौर्णिमा असे नाव पडले. असो,
आश्विन महिन्यात पावसाळा संपतो. त्यामुळे आकाश निरभ्र असते व स्वच्छ चांदण असते, अशा चांदण्या रात्री इष्टमित्रांसह मौजमजा करण्याच्या दृष्टीने हा उत्सव साजरा करतात. राजस्थान मध्ये स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र धारण करून चांदीचे अलंकार घालण्याची प्रथा आहे. आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. यास माडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते, इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्येच असते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. साधकांनी शूचिर्भूत होऊन खालील मंत्र म्हणून लक्ष्मिस् प्रसन्न करावे.
महालक्ष्मी स्तुती…
आदि लक्ष्मि नमस्तेऽस्तु परब्रह्म स्वरूपिणि ।
यशो देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १ ॥
सन्तान लक्ष्मि नमस्तेऽस्तु पुत्र पौत्र प्रदायिनि ।
पुत्रां देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ २ ॥
विद्या लक्ष्मि नमस्तेऽस्तु ब्रह्म विद्या स्वरूपिणि ।
विद्यां देहि कलां देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ३ ॥
धन लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व दारिद्र्य नाशिनि ।
धनं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ४ ॥
धान्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वाभरण भूषिते ।
धान्यं देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ५ ॥
मेधा लक्ष्मि नमस्तेऽस्तु कलि कल्मष नाशिनि ।
प्रज्ञां देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ६ ॥
गज लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व देव स्वरूपिणि ।
अश्वांश गोकुलं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ७ ॥
धीर लक्ष्मि नमस्तेऽस्तु पराशक्ति स्वरूपिणि ।
वीर्यं देहि बलं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ८ ॥
जय लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व कार्य जयप्रदे ।
जयं देहि शुभं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ९ ॥
भाग्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सौमाङ्गल्य विवर्धिनि ।
भाग्यं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १० ॥
कीर्ति लक्ष्मि नमस्तेऽस्तु विष्णुवक्ष स्थल स्थिते ।
कीर्तिं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ ११ ॥
आरोग्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व रोग निवारणि ।
आयुर्देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १२ ॥
सिद्ध लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व सिद्धि प्रदायिनि ।
सिद्धिं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १३ ॥
सौन्दर्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वालङ्कार शोभिते ।
रूपं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १४ ॥
साम्राज्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु भुक्ति मुक्ति प्रदायिनि ।
मोक्षं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे ॥ १५ ॥
मंगले मंगलाधारे मांगल्य मंगल प्रदे ।
मंगलार्थ मंगलेशि मांगल्य देहि मे सदा ॥ १६ ॥
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्रयम्बके देवि नारायणि नमोऽस्तुते ॥ १७ ॥
शुभं भवतु कल्याणी आयुरारोग्य सम्पदाम् ।
मम शत्रु विनाशाय दीप ज्योति नमोऽस्तुते ॥ १८ ॥
दीप ज्योति नमोऽस्तुते, दीप ज्योति नमोऽस्तुते ॥
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे, या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे.
कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पुनम नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. तशी पौर्णिमा आली नाही तर, दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागरी हा शब्द मराठीत अनेकजण कोजागिरी असा चुकीचा उच्चारतात आणि लिहितात.

लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, सौंदर्यलक्ष्मी, भावलक्ष्मी सर्व प्रकारची लक्ष्मी जागरुक माणसांना, लोकांना प्राप्त होते. आळशी, स्वच्छंदी ,प्रमादी विघातक आणि विध्वंसक वृत्तीचा मनुष्य प्रत्यक्ष समोर, साक्षात दारी आलेल्या लक्ष्मीलाही वाढवू शकणार नाही. स्वागत करणार नाही.
उठ जाग मुशाफिर भो भई
अब रैन कहाँ जो सोवत है
जो सोवत है सो खोवत है
जो जागत है सो पावत है
या काव्यपंक्तींचा अर्थ असा आहे की, उठल्यानंतरही माणसाने जागण्याची गरज आहे. असे अनेक असतात की, उठलेली माणसेही जागलेली नसतात ! उठणे हे शारीरिक आहे, तर जागण्यात मानसिक बळ आणि जागृतीचे लक्षण आहे. कोजागिरी व्रताची कथा प्रसिद्ध आहे.
“कोजागिरी पोर्णिमेची” कथा
वलिक नावाचा मगध देशात एक विद्वान ब्राह्मण होता. तो जे तुटपुंजे मिळे, त्यावर आपला उदरनिर्वाह करी. त्यामुळे त्याच्या घरी दारिद्रय असे. त्याच्या पत्नीचे नाव महाचंडी होते. वलिकच्या निर्धनतेला ती कंटाळली होती. आर्थिक ओढगस्तीमुळे ती त्रासली होती. त्यामुळे नवरा सांगेल त्याच्या अगदी विरुद्ध वागायचे असा तिचा स्वभाव झाला होता. अशाच परिस्थितीत वलिकच्या वडिलांचे श्राद्ध आले. श्राद्ध कसे पार पाडणार ?
या विवंचनेत तो ब्राह्मण असताना गणपती नावाच्या त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याला एक युक्ती सांगितली की, तुझी पत्नी सगळ्या गोष्टी प्रतिकूल करीत असेल तर तिला प्रतिकूलच सांग. म्हणजे ती आपोआप अनुकूल त्या गोष्टी करील. ब्राह्मणांने आपल्या मित्राच्या सल्ल्याप्रमाणे स्वयंपाकादि सर्व कामे पत्नीकडून करवून घेतली. या उत्साहाच्या, आनंदाच्या अवस्थेत असताना पिंड विसर्जन करावयाच्या वेळेला तो उलटे बोलावयास विसरला. तो म्हणाला, पिंड नदीत सोडायचे, त्याच्या पत्नीने पिंड गटारात सोडले. त्यामुळे ब्राह्मण संतापला, वैतागला आणि त्या रागानेच तो घराबाहेर पडून लक्ष्मी प्रसन्न होईपर्यंत घराचे आणि बायकोचे तोंड पाहणार नाही या निर्धारानेच तो वनात निघून गेला.
एके दिवशी आश्विन पौर्णिमेला काही नागकन्या कोजागिरीच्या उत्सवात रममाण झालेल्या त्याने पाहिल्या. पूजाअर्चा सर्व पार पडल्यानंतर त्या नागकन्यांना द्यूत खेळावयाचे होते. या नागकन्यांनी त्या ब्राह्मणाला द्यूत खेळावयास बोलाविले. ब्राह्मण द्यूतात आपल्या जवळच्या सर्व वस्तू हरला. लक्ष्मीने ही गोष्ट पाहिली. तिला त्या ब्राह्मणाची दया आली. लक्ष्मीने त्याला धन-दौलत देऊन श्रीमंत केले. तो ब्राह्मण जसा श्रीमंत तसा सुंदरही बनला. त्या नागकन्या त्याच्यावर मोहित झाल्या. त्यांच्याशी गांधर्व विवाह करून तो त्यांच्यासह घरी परतला. पूर्वपत्नी महाचंडी हिच्यावरही त्याने मनापासून प्रेम केले. यामुळे पुढे त्यांचा संसार सुखी झाला.
आश्विन महिन्यात पावसाळा संपून आकाश निरभ्र होते. त्यामुळे चांदणेही स्वच्छ पडते. अशा वेळी इष्टमित्रांसह चांदण्या रात्रीची सुखद मौज लुटता यावी म्हणून हा उत्सव प्रचारात आला. या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावे. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत. म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा ‘धवलरंगी’ उत्सव गणला जातो. धवल चांदण्या रात्री उल्हास धारण करून शरद ऋतूचे वैभव लुटावयाचे व अंगी चैतन्य निर्माण करीत सर्व प्रकारचे ज्ञान ग्रहण करावयास तयार व्हायचे हा या कोजागिरीचा खरा अर्थ आहे.
कोजागिरी पौर्णिमा 2021
कोजागिरी म्हणजे जागृतीचा, वैभवाचा, आनंदाचा, जल्लोषाचा उत्सव होय. त्या दिवशी चंद्र स्वतःच्या सोळाही कलांनी फुललेला, प्रकाशमान झालेला असतो. चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता यांचा समन्वय आढळून येतो. आपले देवांचे अवतार राम व कृष्ण यांच्याजवळही शांत व प्रसन्न सौंदर्य होते म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने, आत्मीयतेने रामचंद्र व कृष्णचंद्र म्हणू लागले.
कोजागरी पोर्णिमा, तुम्हाला खुप सुखकारक व आनंदाची उधळण करणारा जावो हीच सदिच्छा…
अजून वाचा – Aarti Sangrah in Marathi | आरती संग्रह (संपूर्ण)
Leave a Reply