Shri Manache Shlok With Lyrics – Who is Samarth Ramdas Swami श्रीसमर्थ रामदासस्वामी यांचा जन्म गोदावरीच्या काठी जांब या गावी शके १५३० मध्ये रामनवमीच्या दिवशी माध्यान्ही झाला. त्यांचे नाव नारायण होते. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यकांत ठोसर असे होते. आईचे नाव रेणुबाई.
बाराव्या वर्षी त्याला वैराग्य उत्पन्न झाले आणि तो घर सोडून गेला. त्याने उग्र तप केले. प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाने त्याला दर्शन देऊन उपदेश दिला. त्यानंतर ते रामदास बनून तीर्थाटन करून सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यात चाफळ – शिवथरच्या परिसरात वास्तव्य करून राहिले. त्यांनी शके १६०३ मध्ये माघ वद्य नवमीस समाधी घेतली.
श्रीसमर्थांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजात धर्मजागृती करण्यासाठी रामोपासनेवर आणि धर्मरक्षणासाठी बलोपासनेवर भर दिला. त्यांनी रामदासी संप्रदायाची स्थापना करून संघटना उभारली.
गावोगावी आखाडे व मारुती मंदिरे उभारली आणि दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, पदे, आरत्या, इ. विपुल काव्य-रचना केली. समर्थांनी हिंदी भाषेमध्येही खूप लेखन केलेले आहे. समाजाने सावधपणे परमार्थ कसा करावा याची शिकवण त्यांनी दिलेली आहे. दासबोध व मनाचे श्लोक हे ऐहिक व पारमार्थिक जीवन यशस्वी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
मनाचे श्लोक या ग्रंथात २०५ श्लोक असून ते भुजंगप्रयात छंदामध्ये लिहिले गेले आहेत. समर्थ रामदासस्वामी आपल्याला आपले मन आपला मित्र, आपला शत्रू आणि आपला गुरू कसा असू शकतो हे शिकवतात.
लक्षात घ्या की हे आपल्या स्वतःच्या अंतर्गत संवादावर, स्वतःशी, आपल्या मनाशी केंद्रित आहे, म्हणून जिथे जिथे देवाचे संदर्भ असतील, तिथे ते प्रत्येक मनुष्याला लागू होईल, मग ते कोणत्याही धर्माचे आणि देवाबद्दलच्या श्रद्धा असोत.
मनाचे श्लोक
॥ श्रीराम ॥
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
निरूपण – जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्त्व-रज-तम या त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणाचा आरंभ आहे, त्या गणेशाला व परा, पश्यंती, मध्यमा वैखरी या चार वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो.
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ।
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ॥
निरूपण – हे सज्जन मना, तू भक्ति-मार्गाने जा, म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. समाजामध्ये जी निंद्य कर्मे मानली आहेत, ती तू सोडून देव समाजाने जी चांगली कर्मे मानली आहेत, ती तू मनापासून कर..
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढें वैखरीं राम आधीं वदावा ।
सदाचार हा थोर सांडूं नये तो । जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो ॥
निरूपण – पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाव घ्यावे. सदाचरण हे श्रेष्ठ असते. ते कधीही सोडू नये. जो सदाचाराने वागतो, तो मनुष्य या जगात धन्य होतो.
मना वासना दुष्ट कामा नये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
मना धर्मता नीति सोडूं नको हो । मना अंतरीं सार वीचार राहो॥
निरूपण – हे मना, दुष्ट वासना बाळगू नकोस. कधीही पाप – बुद्धी ठेवू नकोस. आपला धर्म आणि नीती कधी सोडू नकोस. नेहमी अंतरात सारासार विचार करीत जा.
मना पापसंकल्प सोडोनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ।
मना कल्पना ते नको वीषयांची । विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ॥
Shri Manache Shlok With Lyrics – What is the meaning of manache shlok?
निरूपण – हे मना, पापाची वासना बाळगू नकोस. नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धर. विषयांमध्ये सुख असते, अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस. विषय-विकारांत बुडल्यास जगात छीथू होते.
Leave a Reply